२८३. आणि जर तुम्ही प्रवासात असाल आणि लिहिणारा आढळला नाही तर तारण गहाण ठेवून व्यवहार करून घ्या आणि जर आपसात एकमेकांवर विश्वास असेल तर ज्याला अनामत दिली गेली आहे, ती त्याने अदा करावी आणि अल्लाहचे भय बाळगून राहावे, जो त्याच्या पालनकर्ता आहे. आणि साक्ष लपवू नका, आणि जो साक्ष लपवील, तो मनाने पापी आहे आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
२८४. जमीन आणि आकाशाची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे. तुमच्या मनात जे काही आहे, ते तुम्ही जाहीर करा किंवा लपवा, अल्लाह त्याचा हिशोब घेईल. मग ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल सजा देईल आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
२८५. पैगंबरांनी त्यावर ईमान राखले, जे त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे अवतरित केले गेले आणि ईमान राखणाऱ्यांनीही ईमान राखले. या सर्वांनी अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांवर आणि त्याच्या ग्रंथांवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखले. त्याच्या पैगंबरांपैकी कोणाच्याही दरम्यान आम्ही फरक करीत नाही. ते म्हणाले की आम्ही ऐकले आणि आज्ञापालन केले. आम्ही तुझ्याजवळ माफी मागतो. हे आमच्या पालनकर्त्या! आणि आम्हाला तुझ्याचकडे परतायचे आहे.
२८६. अल्लाह कोणत्याही आत्म्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे टाकत नाही, जे सत्कर्म करील तर त्याचा मोबदला त्याच्यासाठी आहे आणि जे वाईट कर्म करील तर त्याचे संकट त्याच्यावरच आहे. हे आमच्या पालनकर्त्या! जर आम्ही विसरलो किंवा आमच्याकडून चूक झाल्यास आम्हाला त्याच्याबद्दल पकडीत घेऊ नकोस, हे आमच्या पालनकर्त्या! आमच्यावर ते ओझे टाकू नकोस जे आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकले होते. हे आमच्या पालनकर्त्या! आमच्यावर असे ओझे टाकू नकोस जे उचलण्याची आमच्यात शक्ती नसावी आणि आम्हाला माफ कर, आणि आम्हाला माफी प्रदान कर आणि आमच्यावर दया कर. तूच आमचा स्वामी (मालक) आहेस. आम्हाला काफिर (इन्कारी) जनसमूहावर विजय प्रदान कर.