२६५. जे लोक आपले धन अल्लाहची मर्जी (प्रसन्नता) प्राप्त करण्याकरिता मनाच्या खुशीने आणि विश्वासाने खर्च करतात, त्यांचे उदाहरण त्या बागेसारखे आहे जी जमिनीच्या उंच भागावर असावी आणि जोरदार पावसाने ती आपली फळे दुप्पट देईल आणि तिच्यावर पाऊस जरी पडला नाही, तरी पावसाचा हलका वर्षावही पुरेसा आहे आणि अल्लाह तुमच्या कर्मांना पाहत आहे.
२६६. काय तुमच्यापैकी कोणी असे इच्छितो की त्याच्याजवळ खजूरीच्या आणि द्राक्षांच्या बागा असाव्यात, ज्यात पाण्याचे प्रवाह वाहत असावेत आणि प्रत्येक प्रकारची फळे असावीत आणि बागेचा मालक म्हातारा झालेला असावा, त्याला लहान मुलेही असावीत आणि अचानक त्या बागेवर आगीचे जोरदार वादळ यावे आणि ती जळून खाक व्हावी. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला आपल्या निशाण्या स्पष्टपणे सांगतो, यासाठी की तुम्ही विचार करावा.
२६७. हे ईमानधारकांनो! आपल्या (कष्टाच्या) हलाल कमाईमधून आणि जमिनीतून तुमच्यासाठी आम्ही काढलेल्या वस्तूंमधून खर्च करा. त्यांच्यातल्या खराब वस्तू खर्च करण्याचा (देण्याचा) इरादा करू नका, ज्या तुम्ही स्वतः घेणार नाहीत परंतु डोळे मिटून घ्याल तर गोष्ट वेगळी. आणि लक्षात ठेवा अल्लाह निस्पृह आणि प्रशंसनीय आहे.
२६८. सैतान तुम्हाला गरीबीचे भय दाखवितो, आणि निर्लज्जतेचा आदेश देतो. आणि अल्लाह तुमच्याशी आपल्या दया-कृपेचा वायदा करतो. अल्लाह मोठा मेहरबान आणि ज्ञानसंपन्न आहे.
२६९. तो ज्याला इच्छितो ज्ञान, बुद्धी प्रदान करतो आणि ज्याला बुद्धिमानता प्रदान केली गेली, त्याला फार मोठी भलाई प्रदान केली गेली आणि बोध- उपदेश केवळ बुद्धिमान लोकच ग्रहण करतात.