२६०. आणि जेव्हा इब्राहीम म्हणाले, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मला दाखव की तू मेलेल्याला कशा प्रकारे जिवंत करशील?’’ अल्लाहने फर्माविले, ‘‘काय तुमचे (या गोष्टीवर) ईमान नाही?’’ उत्तर दिले, ‘‘ईमान तर आहे, परंतु अशाने माझ्या मनाला समाधान लाभेल.’’ अल्लाहने फर्माविले, ‘‘चार पक्षी घ्या. त्यांचे तुकडे करून टाका, मग प्रत्येक पर्वतावर त्यांचा एक एक हिस्सा ठेवून द्या, नंतर त्यांना हाक मारा, ते तुमच्या जवळ धावत येतील आणि जाणून असा की अल्लाह मोठा जबरदस्त हिकमत राखणारा आहे.’’
२६१. जे लोक अल्लाहच्या मार्गात आपला माल (धन) खर्च करतात, त्यांचे उदाहरण त्या दाण्यासारखे आहे, ज्यातून सात कणसे निघावीत आणि प्रत्येक कणसात शंभर दाणे असावेत आणि अल्लाह ज्याला इच्छिल अनेक पटींनी देईल, आणि अल्लाह मोठा व्यापकता राखणारा आणि ज्ञान राखणारा आहे.
२६२. जे लोक आपले धन, अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, मग त्यानंतर उपकार दर्शवित नाही आणि क्लेश-यातनाही देत नाहीत, त्यांचा मोबदला, त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसले भय राहील, ना ते दुःखी-कष्टी होतील.
२६४. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपले दान, उपकार दर्शवून आणि दुःख पोहचवून वाया जाऊ देऊ नका, ज्याप्रमाणे तो मनुष्य, जो आपले धन लोकांना दाखविण्यासाठी खर्च करील आणि ना अल्लाहवर ईमान राखील, ना कयामतवर, तर त्याचे उदाहरण त्या चिकण्या दगडासारखे आहे, ज्याच्यावर थोडीशी माती असावी, मग त्यावर जोराचा पाऊस पडावा, परिणामी पावसाने त्याला अगदी साफ आणि सक्त (कठोर) सोडावे. या देखावा करणाऱ्यांना आपल्या कमाईपासून काहीच हाती लागणार नाही आणि अल्लाह इन्कार करणाऱ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करीत नाही.