२४६. काय तुम्ही मूसानंतरच्या इस्राईली वंशाच्या जमातीस नाही पाहिले, जेव्हा त्यांनी आपल्या पैगंबरास म्हटले की आमच्यावर एखाद्याला बादशहा नेमून द्या, यासाठी की आम्ही अल्लाहच्या मार्गात लढावे. पैगंबर म्हणाले, संभवतः जिहाद फर्ज (अनिवार्य) झाल्यानंतर तुम्ही जिहाद करण्यास इन्कार कराल. लोक म्हणाले, आम्ही अल्लाहच्या मार्गात का नाही लढणार? आम्हाला तर आपल्या घरादारांपासून आणि मुलाबाळांपासून दूर केले गेले आहे. मग जेव्हा त्यांच्यावर जिहाद फर्ज (अनिवार्य) केला गेला तेव्हा काही थोड्या लोकांखेरीज इतर सर्व मुकरले, आणि अल्लाह अत्याचारी लोकांना खूप चांगले जाणतो.
२४७. आणि त्यांना त्यांचे पैगंबर म्हणाले, अल्लाहने तालूत (नावाच्या व्यक्ती) ला, तुमचा बादशहा बनविले आहे. तेव्हा ते म्हणू लागले, त्याची राज्य-सत्ता आमच्यावर कशी बरे असू शकते. त्याच्यापेक्षा खूप जास्त राज्य-सत्तेचे हक्कदार तर आम्ही आहोत. त्याला तर विपुल धनही प्रदान केले गेले नाही. पैगंबर म्हणाले, ऐका! सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला तुमच्यावर प्राधान्य दिले आहे आणि त्याला ज्ञान व शारीरिक शक्तीही जास्त प्रदान केली आहे. खरी गोष्ट अशी की अल्लाह ज्याला इच्छितो आपला मुलूख प्रदान करतो. अल्लाह मोठी व्यापकता आणि ज्ञान राखणारा आहे.
२४८. त्यांचे पैगंबर पुन्हा त्यांना म्हणाले, त्याच्या मुलूखाची स्पष्ट निशाणी ही आहे की तुमच्याजवळ ती पेटी परत येईल, जिच्या तुमच्या पालनकर्त्यातर्फे मनाच्या शांतीची सामग्री आहे आणि मूसाच्या संततीने व हारूनच्या संततीने आपल्या मागे सोडलेले सामान आहे. फिरश्ते ती पेटी उचलून आणतील. निःसंदेह, ही तर तुमच्यासाठी स्पष्ट निशाणी आहे, जर तुम्ही ईमान बाळगत असाल.