१९७. हजचे महिने निर्धारीत आहेत. यास्तव जो या ठराविक दिवसात हजचा पक्का इरादा करील तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करण्यापासून, अपराध करण्यापासून आणि भांडण-तंटा करण्यापासून दूर राहावे. तुम्ही जे सवाब (पुण्य) चे काम कराल, ते सर्वश्रेष्ठ अल्लाह जाणणारा आहे, आणि आपल्यासोबत प्रवासखर्च (साधन-सामग्री) अवश्य घ्या. सर्वांत उत्तम असा प्रवासखर्च तर अल्लाहचे भय आहे. आणि हे बुद्धिमानानो! माझे भय बाळगत राहा.
१९८. आपल्या पालनकर्त्याची कृपा शोधण्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही. जेव्हा तुम्ही अरफात (या ठिकाणापासून) परत व्हाल, तेव्हा मशअरे हराम (मुज्दलिफा) जवळ अल्लाहचे स्मरण करा आणि अशा प्रकारे स्मरण करा, जसे त्याने तुम्हाला शिकविले आहे. वास्तविक यापूर्वी तुम्ही मार्गभ्रष्ट लोकांमध्ये होता.
१९९. मग तुम्ही त्या स्थानापासून परत फिरा, ज्या स्थानापासून सर्व लोक परत फिरतात आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
२००. मग जेव्हा तुम्ही हजचे प्रत्येक काम (विधी) पूर्ण करून घ्याल, तेव्हा अल्लाहचे स्मरण करा ज्याप्रकारे तुम्ही आपल्या थोर-बुजूर्ग लोकांचे स्मरण करीत होते, किंबहुना त्याहून जास्त. काही लोक तर असेही आहेत, जे म्हणतात, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला या जगात देऊन टाक’’ अशा लोकांचा आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही.
२०१. आणि काही लोक असेही आहेत, जे म्हणतात, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला या जगातही भलाई प्रदान कर आणि आखिरतमध्येही भलाई प्रदान कर आणि आम्हाला जहन्नमच्या अज़ाबपासून वाचव.’’