२९. जेव्हा (हजरत) मूसा (अलै.) यांनी मुदत पूर्ण केली आणि आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाले, तेव्हा तूर नावाच्या पर्वताकडे आग पाहिली. आपल्या पत्नीला म्हणाले, थांबा! मी आग पाहिली आहे. फार संभव आहे की मी तेथून एखादी बातमी आणावी किंवा आगीचा निखारा (विस्तव) आणावा, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे.
३०. यास्तव, जेव्हा त्या ठिकाणी पोहचले तेव्हा त्या शुभ धरतीच्या मैदानाच्या उजवीकडील झाडामधून साद घातली गेली की, हे मूसा! निःसंशय, मीच अल्लाह आहे, सर्व विश्वांचा पालनकर्ता.
३१. आणि हे की आपली काठी खाली टाका. मग जेव्हा तिला पाहिले, ती सापासारखी वळवळ करीत आहे तेव्हा पाठ फिरवून परतले आणि मागे वळून तोंडही दाखवले नाही. आम्ही फर्माविले, हे मूसा! पुढे या. भयभीत होऊ नका. निःसंशय, तुम्ही सर्व प्रकारे अगदी सुरक्षित आहात.
३२. आपला हात आपल्या खिशात घाला, तो कसल्याही प्रकारच्या डागाविना पूर्ण शुभ्र चकाकणारा होऊन बाहेर निघेल आणि भय- दहशतीपासून आपला बचाव करण्याकरिता आपली भुजा आपल्याशी समेटून घ्या. हे दोन चमत्कार (मोजिजे) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहेत, फिरऔन आणि त्याच्या समूहाकडे (प्रस्तुत करण्यासाठी). निःसंशय, ते सर्वच्या सर्व अवज्ञा करणारे दुराचारी लोक आहेत.
३४. आणि माझा भाऊ हारुन माझ्यापेक्षा अधिक साफ बोलणारा आहे. तू त्याला देखील माझा सहाय्यक बनवून माझ्यासोबत पाठव, यासाठी की त्याने मला खरे मानावे. मला तर भीती वाटते की ते सर्व मला खोटे ठरवतील.
३५. (अल्लाहने) फर्माविले, आम्ही तुमच्या बंधुद्वारे तुम्हाला मजबूत बाजू प्रदान करू आणि तुम्हा दोघांना वर्चस्वशाली करू, तेव्हा फिरऔनचे लोक तुमच्यापर्यंत पोहचूच शकणार नाहीत. आमच्या निशाण्यांमुळे तुम्ही दोघे आणि तुमचे अनुयायीच सफल ठरतील.