२३. आणि मदयन येथे जेव्हा पाण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा पाहिले की लोकांचा एक समूह तिथे पाणी पाजत आहे आणि दोन स्त्रिया एका बाजूला (आपल्या जनावरांना) रोखून उभ्या असलेल्या दिसल्या. विचारले की तुमची काय समस्या आहे? त्या म्हणाल्या की जोपर्यंत हे गुराखी परतून जात नाहीत, आम्ही तोपर्यंत पाणी पाजू शकत नाही आणि आमचे पिता फार म्हातारे आहेत.
२४. यास्तव त्यांनी स्वतः(मुसा) त्या (जनावरां) ना पाणी पाजले, मग सावलीकडे चालत गेले आणि म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! तू जे काही मांगल्या माझ्यावर अवतरित करशील, मी त्याचा गरजवंत आहे.
२५. इतक्यात त्या दोघींपैकी एक त्यांच्याकडे लाजत लाजत आली आणि म्हणाली की माझे पिता तुम्हाला बोलवित आहेत, यासाठी की तुम्ही जे आमच्या जनावरांना पाणी पाजले आहे, त्याचा मोबदला द्यावा. जेव्हा (हजरत मूसा) त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांना आपली सर्व कथा ऐकविली, तेव्हा ते (पिता) म्हणाले, आता भय बाळगू नका. तुम्ही अत्याचारी लोकांपासून मुक्ती प्राप्त केली.
२६. त्या दोघींपैकी एक म्हणाली, हे पिता! तुम्ही त्यांना मजुरीवर ठेवून घ्या, कारण त्यांना तुम्ही मजुरीवर राखाल त्यांच्यापैकी सर्वांत चांगला तो आहे जो बलवान आणि विश्वस्त असावा.
२७. त्या (वृद्ध पित्या) ने म्हटले की मी आपल्या या दोन मुलींपैकी एकीला तुमच्या विवाह (बंधना) मध्ये देऊ इच्छितो या (महर- स्त्रीधना) वर की तुम्ही आठ वर्षां पर्यंत माझे कामकाज करावे, मात्र जर तुम्ही दहा वर्षां पर्यंत कराल तर हे तुमच्यातर्फे उपकार म्हणून आहे. मी कधीही असे इच्छित नाही की तुमच्यावर कशाही प्रकारची कष्ट- यातना टाकावी. अल्लाहने इच्छिले तर भविष्यात तुम्ही मला एक भला माणूस पाहाल.
२८. (मूसा अलै.) म्हणाले, ठीक आहे. ही गोष्ट तर माझ्या आणि तुमच्या दरम्यान निश्चित ठरली. मी या दोन्हीं मुदतींपैकी जी मुदत पूर्ण करेन, माझ्यावर जोरजबरदस्ती होऊ नये. आम्ही हे जे काही (आपसात) बोलत आहोत, त्यावर अल्लाह (साक्षी आणि) निरीक्षक आहे.