(१) ‘‘थोड्याशा किंमतीवर विकू नका’’ याचा अर्थ असा कदापि नाही की जास्त किंमत मिळाल्यास अल्लाहच्या आदेशाचा सौदा करा, किंबहुना याचा अर्थ असा की अल्लाहच्या आदेशाच्या तुलनेत ऐहिक लाभाला मुळीच महत्त्व देऊ नका. अल्लाहचे आदेश तर इतके मौल्यवान आहेत की साऱ्या जगाची सामग्री आणि चीजवस्तू त्यांच्या तुलनेत तुच्छ आहेत. आयतीत इस्राईलच्या पुत्रांकडे संकेत केला गेला असला तरी हा आदेश कयामतपर्यंत सर्व मानवांकरिता आहे. जो कोणी सत्याला सोडून असत्याची बाजू धरेल किंवा अज्ञान दाखवून केवळ ऐहिक लाभासाठी सत्याकडे पाठ फिरविल, त्याला हा आदेश लागू पडतो.
(१) सबूरी आणि नमाज दोन्ही अल्लाहवाल्यांचे दोन मोठे शस्त्र आहेत. नमाजद्वारे एका ईमानधारकाचा अल्लाहशी संबंध सहजपणे होतो, ज्यामुळे त्याला अल्लाहची प्रसन्नता व सहायता लाभते.धीर सयंम राखल्याने त्याच्या चारित्र्यात दृढता आणि धर्मपालनात स्थैर्यशिलता निर्माण होते.