(१) ‘सुर’शी अभिप्रेत तो शंख होय, ज्यात इस्राफील (अलै.) अल्लाहच्या आदेशाने फुंक मारतील. ही फुंक दोन किंवा दोनपेक्षा जास्त असेल. पहिल्या फुंकीत सारे जग घाबरून जाऊन बेभान होईल, दुसऱ्या फुंकीत सर्व मरण पावतील आणि तिसऱ्या खेपेस सर्व लोक कबरींमधून जिवंत होऊन उभे राहतील आणि काहींच्या मते चौथी फुंक असेल ज्यात सर्व हश्र (हिशोबा) च्या मैदानात जमा होतील. या ठिकाणी कोणती फुंक अभिप्रेत आहे? इमाम इब्ने कसीर यांच्या मते ही पहिली फुंक आणि इमाम शौकानी यांच्या मते तिसरी फुंक होय, जेव्हा लोक कबरीमधून उठतील.