२५. निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांना (संदेशवाहकांना) स्पष्ट निशाण्या देऊन पाठविले आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि न्याय (तराजू) अवतरित केला, यासाठी की लोकांनी न्यायावरकायम राहावे आणि आम्ही लोखंडही अवतरित केले, ज्यात मोठी (हैबत आणि) ताकद आहे आणि लोकांसाठी इतरही अनेक फायदे आहेत आणि यासाठीही की अल्लाहने हे जाणून घ्यावे की त्याची व त्याच्या पैगंबरांची मदत न पाहता कोण करतो. निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.
२६. निःसंशय, आम्ही नूह आणि इब्राहीम (अलै.) यांना (पैगंबर बनवून) पाठविले आणि आम्ही त्या दोघांच्या संततीत प्रेषित्व आणि ग्रंथ कायम ठेवला , तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी मार्गदर्शन अंगीकारले आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण दुराचारी राहिले.
२७. त्यांच्यानंतर, तरीही आम्ही सतत आपले पैगंबर पाठवित राहिलो आणि त्यांच्यानंतर मरियमचा पुत्र ईसाला पाठविले व त्यांना इंजील (ग्रंथ) प्रदान केला आणि त्यांच्या अनुयायींच्या मनात प्रेम आणि दयेची भावना ठेवली, परंतु वैराग्याचा मार्ग त्यांनी स्वतः शोधून कढला, आम्ही तो त्यांच्यासाठी अनिवार्य केला नव्हता, अल्लाहच्या प्रसन्नतेचा शोध घेण्याखेरीज, तेव्हा त्यांनी त्याचे पूर्णतः पालन केले नाही, तरी देखील आम्ही त्यांच्यापैकी ज्यांनी ईमान राखले होते, त्यांना त्यांचा मोबदला प्रदान केला आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक दुराचारी आहेत.
२८. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा, अल्लाह तुम्हाला आपल्या दयेने दुप्पट हिस्सा देईल आणि तुम्हाला दिव्य तेज (नूर) प्रदान करील, ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालाल आणि तो (तुमचे अपराधीही) माफ करील, अल्लाह मोठा माफ करणारा अतिशय दयावान आहे.
२९. हे अशासाठी की (अल्लाहचा) ग्रंथ बाळगणाऱ्यांनी जाणून घ्यावे की अल्लाहच्या कृपेच्या कोणत्याही हिश्यावर त्यांचा अधिकार नाही आणि हे की, समस्त कृपा अल्लाहच्याच हाती आहे, तो ज्याला इच्छिल, देईल आणि अल्लाहच मोठा कृपावंत आहे.