१०. इन्कारी लोकांना त्यांची धन-दौलत आणि त्यांची संतती अल्लाहच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासून सोडिवण्यात काही कामी येऊ शकणार नाही आणि हे लोक तर जहन्नमचे इंधन आहेतच.
११. ज्याप्रमाणे फिरऔनच्या संततीची दुर्दशा झाली आणि त्यांची, जे त्यांच्यापूर्वी होऊन गेले त्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले, मग अल्लाहने त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल पकडीत घेतले आणि अल्लाह मोठी सक्त (कठोर) शिक्षा देणारा आहे.
१२. काफिर लोकांना (इन्कार करणाऱ्यांना) सांगा की तुम्हा लोकांना निकट भविष्यात पराभूत केले जाईल आणि तुम्हाला जहन्नमकडे जमा केले जाईल आणि किती वाईट ठिकाण आहे ते!
१३. निःसंशय, तुमच्यासाठी (बोधदायक) निशाणी होती, त्या दोन समूहांमध्ये जे आपसात भिडले होते. त्यापैकी एक समूह अल्लाहच्या मार्गात लढत होता आणि दुसरा समूह काफिरांचा (इन्कारी लोकांचा) होता, जो त्यांना आपल्या डोळ्यांनी दुप्पट झालेले पाहात होता. आणि अल्लाह ज्याला इच्छितो, आपल्या मदतीने मजबूत (सामर्थ्यवान) करतो. निःसंशय, डोळे असणाऱ्यांकरिता यात मोठा बोध-उपदेश आहे.
१४. आवडत्या व मनपसंत गोष्टींचे प्रेम लोकांसाठी सुशोभित केले गेले आहे. उदाहरणार्थ, स्त्रिया आणि पुत्र, सोने-चांदीचे जमा केलेले खजिने, आणि निवडक निशाणीचे घोडे आणि गुरे-ढोरे व शेती वगैरे. ही सर्व ऐहिक जीवनाची सामग्री आहे आणि परतण्याचे उत्तम ठिकाणतर अल्लाहच्याच जवळ आहे.
१५. तुम्ही सांगा, काय मी तुम्हाला याहून उत्तम अशी गोष्ट सांगू अल्लाहचे भय राखणाऱ्या लोकांकरिता, त्यांच्या पालनकर्त्याजवळ जन्नती आहेत ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्यात ते नेहमी नेहमी राहतील, आणि पाक साफ (स्वच्छ-शुद्ध) पत्न्या आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रसन्नता आहे आणि सर्वच्या सर्व दास अल्लाहच्या नजरेत आहेत.