११०. तुमचा जनसमूह, सर्वोत्तम जनसमूह आहे, जो लोकांसाठी निर्माण केला गेला आहे, कारण तुम्ही सत्कर्मांचा आदेश देता आणि दुष्कर्मांपासून रोखता आणि अल्लाहवर ईमान राखता. जर ग्रंथधारकांनीही ईमान राखले असते तर त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते. त्यात काही ईमान बाळगणारेही आहेत परंतु अधिकांश लोक दुराचारी आहेत.
१११. असे लोक तुम्हाला सताविण्याखेरीज आणखी जास्त काही नुकसान पोहचवू शकत नाहीत आणि जर तुमच्याशी लढाई झाली तर पाठ दाखवून पळ काढतील. मग कोणी त्यांची मदत करायला येणार नाही.
११२. असे लोक प्रत्येक ठिकाणी अपमानित होत राहतील, तथापि अल्लाहच्या किंवा लोकांच्या आश्रयाखाली असतील तर गोष्ट वेगळी. मात्र हे लोक अल्लाहच्या प्रकोपास पात्र ठरले आणि त्यांच्यावर दारिद्य्र आणि दुर्दशा टाकली गेली. हे अशासाठी झाले की हे लोक अल्लाहच्या आयातींचा इन्कार करीत होते, आणि पैगंबरांची नाहक हत्या करीत होते. हा मोबदला त्यांच्या आज्ञाभंगाचा आणि मर्यादा पार करण्याचा आहे.
११३. हे सर्वच्या सर्व एकसमान नाहीत, किंबहुना या ग्रंथधारकांत एक समूह (सत्यावर) कायमही आहे, जे रात्री अल्लाहच्या आयतींचे पठण करतात व सजदा (अल्लाहसमोर माथा टेकत) करीत असतात.
११४. हे लोक अल्लाह आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखतात, सत्कर्मांचा आदेश देतात आणि दुष्कर्मांपासून रोखतात आणि भल्या कामांमध्ये घाई करतात. हे नेक व सदाचारी लोकांपैकी आहेत.
११५. आणि हे जे काही नेकीचे काम करतील, त्याची उपेक्षा केली जाणार नाही आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह, परहेजगार (अल्लाहचे भय राखून वागणाऱ्या) लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.