(१) अर्थात, ज्या प्रकारे उपरोक्त बाबींमध्ये अल्लाह अद्वितीय आहे, त्याचा कोणीही सहभागी नाही, तद्वतच परोक्ष - ज्ञानाबाबतही तो अद्वितीय आहे. त्याच्याखेरीज कोणालाही गैबी (अपरोक्ष) गोष्टींचे ज्ञान नाही. पैगंबरांना देखील तेवढेच ज्ञान असते जेवढे अल्लाह वहयी आणि आपल्या प्रेरणेद्वारे त्यांना देतो, आणि जे ज्ञान दुसऱ्याच्या सांगण्याने प्राप्त होत असेल तर ते जाणणाऱ्याला परोक्ष - ज्ञाता म्हटले जाऊ शकत नाही. परोक्षाचे ज्ञान तर ते होय, जे कसल्याही माध्यमाविना, स्वतःलाच असावे. ज्ञाता प्रत्येक गोष्टीस स्वतः जाणणारा असावा. सूक्ष्मातिसूक्ष्म व लपलेली गोष्टही त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नसावी. हे वैशिष्ट्य केवळ अल्लाहचेच आहे यास्तव तोच परोक्षज्ञाता आहे. त्याच्याखेरीज साऱ्या जगात परोक्ष ज्ञान राखणारा कोणीही नाही. हजरत आयशा (रजि.) फर्मावितात की जो मनुष्य असे समजतो की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भविष्यात होणाऱ्या घटनांचे ज्ञान राखतात, त्याने अल्लाहवर फार मोठे कुभांड रचले, यासाठी की तो (अल्लाह) फर्मावितो की ‘‘आकाश व धरतीत गैबचे ज्ञान अल्लाहलाच आहे.’’ (सहीह बुखारी नं. ४८५५, सहीह मुस्लिम नं. २८७, आणि अल तिर्मिजी नं. ३०६८)
(१) अहले किताब (अल्लाहचा ग्रंथ बाळगणारे) अर्थात यहूदी आणि ख्रिश्चन अनेक पंथ - संप्रदायांत विभागले गेले. त्यांचे विचारही परस्पर भिन्न होते. यहूदी लोक हजरत ईसा यांचा अनादर व अपमान करीत आणि ख्रिश्चन त्यांच्या आदर सन्मानात अतिशयोक्ती करीत. येथपावेतो की त्यांना अल्लाह किंवा अल्लाहचा पुत्र बनविले. पवित्र कुरआनने त्यांच्याच संदर्भात अशा गोष्टी सांगितल्या ज्याद्वारे सत्य स्पष्ट होते आणि जर ते कुरआनाने सांगितलेल्या सत्यतेला स्वीकारतील तर त्यांचा श्रद्धेशी संबंधित विरोध नाहीसा होईल आणि त्यांचा आपसातील मतभेद व फुटीरता कमी होईल.