८५. आणि (आम्ही) मदयनकडे त्यांचे भाऊ शोऐब यांना पाठविले. शोऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही माबूद नाही तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ स्पष्ट निशाणी येऊन पोहोचली आहे. तेव्हा तुम्ही माप तोल पुरेपूर करीत जा, आणि लोकांना त्यांच्या चीज-वस्तू कमी करून देऊ नका आणि साऱ्या धरतीवर, सुधारणा केली गेल्यानंतर फसाद (उत्पात-उपद्रव) पसरवू नका. हे तुमच्यासाठी लाभदायक आहे जर तुम्ही ईमान राखाल.