३७. आणि ते म्हणाले की, त्यांच्यावर त्यांच्या पानलकर्त्यातर्फे एखादा मोजिजा (चमत्कार) का नाही उतरविला गेला? तुम्ही सांगा की अल्लाह एखादा चमत्कार उतरविण्याचे पुरेपूर सामर्थ्य राखतो तथापि बहुतेक लोक जाणत नाहीत.
३८. आणि जितक्या प्रकारचे सजीव जमिनीवर चालणारे आहेत, आणि जितक्या प्रकारचे पंखांनी उडणारे पक्षी आहेत, त्यांच्यापैकी कोणीही असा नाही, जो तुमच्यासारखा एक समूह नसावा. आम्ही ग्रंथात लिहून ठेवण्यात एकही गोष्ट सोडली नाही, मग सर्व लोक आपल्या पालनकर्त्याजवळ जमा केले जातील.
३९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, ते बहीरे, मुके आहेत, अंधारात पडले आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्गास लावतो.
४०. तुम्ही सांगा की आपली काय अवस्था होईल ते सांगा की जर तुमच्यावर अल्लाहचा एखादा अज़ाब येऊन कोसळावा किंवा तुमच्यापर्यंत कयामतच येऊन पोहचावी, तर काय अल्लाहशिवाय इतरांना पुकाराल? (सांगा) जर तुम्ही सच्चे असाल.
४१. किंबहुना, विशेषतः त्यालाच पुकाराल, मग ज्यासाठी तुम्ही पुकाराल, जर त्याने इच्छिले तर त्यास हटवूनही देईल आणि ज्यांना तुम्ही अल्लाहचे सहभागी ठरविता, त्या सर्वांना विसरून जाल.
४२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या इतर जनसमूहांकडेही पैगंबर पाठविले होते. त्यांनादेखील आम्ही गरीबी व रोगराईने धरले, यासाठी की त्यांनी गयावया करावी.
४३. अशा प्रकारे जेव्हा त्यांना आमची सजा मिळाली तर ते कमजोर का नाही पडतील? परंतु त्यांची मने कठोर झालीत आणि सैतानाने त्यांच्या कर्मांना, त्यांच्या विचारात चांगले करून दाखविले.
४४. आणि जेव्हा ते त्या उपदेशाला विसरले, ज्याची त्यांना शिकवण दिली गेली होती, तर आम्ही त्यांच्यावर प्रत्येक चीज-वस्तूचे दरवाजे खुले केले, येथपर्यंत की जेव्हा आपण प्राप्त केलेल्या चीजवस्तूंवर ते घमेंड करू लागले तेव्हा त्यांना आम्ही अचानक तावडीत घेतले, मग ते निराश होऊन बसले.