१. निश्चितच, अल्लाहने त्या स्त्रीचे म्हणणे ऐकले, जी तुमच्याशी आपल्या पतीबाबत वाद घालीत होती, आणि अल्लाहसमोर गाऱ्हाणे करीत होती. अल्लाह तुम्हा दोघांचा वार्तालाप (वादविवाद) ऐकत होता. निःसंशय, अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.
२. तुमच्यापैकी जे लोक आपल्या पत्नींशी जिहार करतात (म्हणजे त्यांना माता संबोधून बसतात) त्या वास्तविक त्यांच्या माता नाहीत, त्यांच्या माता तर त्याच आहेत, ज्यांच्या गर्भातून त्यांनी जन्म घेतला आहे, निःसंशय हे लोक एक अयोग्य आणि असत्य गोष्ट बोलतात. निःसंशय, अल्लाह मोठा क्षमाशील आणि माफ करणारा आहे.
३. जे लोक आपल्या पत्नींशी जिहार करून बसतील, मग आपले कथन परत घेतील तर त्यांना, आपसात एकमेकांना हात लावण्याआधी एक गुलाम (दास) मुक्त करावा लागेल. याच्याद्वारे तुम्हाला उपदेश केला जात आहे, आणि अल्लाह तुमच्या समस्त कर्मांना जाणतो.
४. तथापि ज्याला गुलाम आढळून न आला तर त्याने दोन महीने सतत रोजे राखावेत, यापूर्वी की एकमेकांना हात लावावा आणि ज्याला याचेही सामर्थ्य नसेल तर त्याने साठ गरीबांना जेऊ घालावे, हे यासाठी की तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखावे. या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत आणि काफिरांसाठीच दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहेत.
५. निःसंशय, जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते अपमानित केले जातील, जसे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित केले गेले आणि निःसंशय, आम्ही स्पष्ट आयती अवतरित केल्या आहेत आणि काफिर (सत्य विरोधक) लोकांसाठी अपमानित करणारा अज़ाब आहे.
६. ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना (जिवंत करून) उठविल, मग त्यांना त्यांच्या कृत-कर्मांशी अवगत करील (ज्यास) अल्लाहने मोजून ठेवले आहे आणि ज्याचा यांना विसर पडला होता आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीशी अवगत आहे.