५१. हे ईमानधारकांनो! तुम्ही यहूदींना आणि ख्रिश्चनांना दोस्त बनवू नका, हे तर आपसातच एकमेकांचे दोस्त आहेत. तुमच्यापैकी जो कोणी यांच्याशी दोस्ती करील तर तो त्यांच्यापैकीच ठरेल. अत्याचारी लोकांना अल्लाह कधीही (सरळ) मार्ग दाखवित नाही.
५२. तुम्ही पाहाल की ज्यांच्या मनात विकार आहे ते धावत जाऊन त्यांच्यात मिसळतात आणि म्हणतात की आम्हाला भय वाटते की कदाचित असे न व्हावे की एखादे संकट आमच्यावर कोसळावे, फार शक्य आहे की अल्लाहने विजय प्रदान करावा किंवा आपल्याकडून अन्य एखादा फैसला करावा मग तर हे आपल्या मनात लपविलेल्या गोष्टीबद्दल खूप लज्जित होतील.
५३. आणि ईमानधारक म्हणतील की काय हेच ते लोक होते, जे मोठ्या विश्वासाने अल्लाहची शपथ घेऊन म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यांचे सर्व कर्म वाया गेले आणि ते असफल झाले.
५४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्यापैकी जो कोणी आपल्या दीन-धर्मापासून परावृत्त होईल, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह लवकरच अशा जनसमूहाच्या लोकांना आणील अल्लाह ज्यांच्याशी प्रेम राखील आणि तेदेखील अल्लाहशी प्रेम करत असतील. ईमानधारकांसाठी ते कोमलहृदयी असतील, परंतु काफिरांसाठी मात्र कठोर आणि निर्दयी असतील, ते अल्लाहच्या मार्गात जिहाद करतील, कोणा निंदा-नालस्ती करणाऱ्यांच्या आरोपाची पर्वा करणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे, ज्याला इच्छितो, प्रदान करतो, अल्लाह सर्वशक्तिमान आहे आणि अतिशय ज्ञान बाळगणारा आहे.
५५. (हे ईमानधारकांनो!) तुमचा मित्र स्वतः अल्लाह आणि त्याचा पैगंबर आहे आणि ईमान राखणारे लोक आहेत. जे नमाज कायम करतात आणि जकात देत राहतात आणि अल्लाहसमोर (एकाग्रचित्त होऊन) झुकणारे आहेत.
५६. आणि जो मनुष्य, सर्वश्रेष्ठ अल्लाहशी, त्याच्या पैगंबराशी आणि ईमानधारकांशी दोस्ती राखील तर त्याने विश्वास ठेवला पाहिजे की अल्लाहचे दासच वर्चस्वशाली राहतील.
५७. (ईमानधारकांनो!) तुम्ही अशा लोकांना आपला मित्र बनवू नका, जे तुमच्या दीन-धर्माला खेळ-तमाशा बनवून थट्टा उडवितात, मग ते त्यांच्यापैकी असोत ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला किंवा काफिर (इन्कारी) असोत जर तुम्ही (खरोखर) ईमानधारक असाल तर अल्लाहचे भय बाळगून राहा.