(१) हजरत लुकमान अल्लाहचे सदाचारी दास होते. अल्लाहने त्यांना बुद्धी, हिकमत आणि धार्मिक बाबींमध्ये उच्च स्थान प्रदान केले होते. त्यांना एकाने विचारले, तुम्हाला हे ज्ञान ही बुद्धी कशी प्राप्त झाली, ते म्हणाले, सरळ मार्गावर राहिल्याने, ईमानदारी अंगीकारल्याने आणि व्यर्थ गोष्टींपासून अलिप्त राहिल्याने, गप्प राहिल्याने. ते गुलाम होते. त्यांचा मालक म्हणाला, बकरी कापून त्याचे सर्वांत चांगले दोन हिस्से आणा. शेवटी ते जीभ आणि हृदय घेऊन आले. दुसऱ्या एका प्रसंगी मालक म्हणाला, बकरी कापून तिचे सर्वांत वाईट दोन हिस्से आणा. त्यांनी पुन्हा जीभ आणि हृदय काढून आणले. यावर विचारले असता त्यांनी सांगितले की जीभ आणि हृदय जर ठीक असेल तर ते सर्वांत चांगले आहेत आणि ते बिघडले तर त्यांच्यापेक्षा वाईट काहीच नाही. (इब्ने कसीर)