(१) या दुःख-यातनेचा उल्लेख करून माता-पित्याशी सद्वर्तन करण्यावर खास जोर दिला आहे, ज्यावरून हे कळते की माता या सद्वर्तनाच्या आदेशात पित्याच्या आधी आहे, कारण सतत नऊ महिने गर्भाचा त्रास आणि नंतर प्रसुतीच्या वेदना फक्त आईच झेलते, तसेच दुग्धपानाची पीडाही एकटी आईच सहन करते, पित्याचा त्यात सहभाग नसतो. यास्तव हदीस वचनात मातेशी सद्वर्तन करण्याला प्राधान्य दिले गेले आहे आणि पित्याचा दर्जा त्या नंतरचा सांगितला गेला आहे. एकदा एका निकट सहवासातील अनुयायी (साहबी) ने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विचारले, ‘माझ्या चांगल्या वागणुकीचा सर्वांत जास्त हक्कदार कोण आहे?’ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘तुमची माता.’ त्याने पुन्हा हेच विचारले. पैगंबरांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदाही हेच उत्तर दिले. चौथ्या वेळेस प्रश्न विचारल्यावर पैगंबरांनी फर्माविले, ‘तुमचा पिता’. (सहीह मुस्लिम किताबूल बिर्रेवस्सिला, पहिला अध्याय)