(१) ईमान राखणाऱ्यांना संबोधित करून त्यांना उपदेश केला जात आहे. अल्लाहशी भय राखण्याचा अर्थ, त्याने ज्या ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे त्या अमलात आणाव्या आणि ज्या गोष्टींची मनाई केली आहे, त्यापासून अलिप्त राहावे. या आयतीत ही गोष्ट जोर देण्यासाठी दोन वेळा फर्माविली गेली आहे. कारण हा तकवा (अल्लाहचे भय) च माणसाला सत्कर्म करण्यास व दुष्कर्माचा अव्हेर करण्यास प्रवृत्त करतो. (२) ‘उद्या’शी अभिप्रेत कयामत आहे. अर्थात विश्वाचा अंत. त्याला उद्या या अर्थाने सांगून या गोष्टीकडेही इशारा केला आहे की कयामतचे घडून येणे खूप लांब नाही, किंबहुना निकटचे आहे.
(१) ज्यांनी अल्लाहचा विसर पाडून ही गोष्टही ध्यानी राखली नाही की अशा प्रकारे ते स्वतःच आपल्या प्राणांवर अत्याचार करीत आहेत, आणि एक दिवस असा येईल की याच्या परिणामस्वरूपी त्यांचे हे शरीर, ज्याच्यासाठी ते जगात मोठ्या कष्ट यातना झेलत होते, जहन्नमच्या आगीचे इंधन बनेल. आणि त्यांच्या तुलनेत दुसरे लोक होते ज्यांनी अल्लाहचे स्मरण राखले, त्याच्या आदेशानुसार जीवन व्यतीत केले. एक वेळ येईल की अल्लाह त्यांना त्याचा उत्तम मोबदला प्रदान करील आइ आपल्या जन्नतमध्ये दाखल करील जिथे त्यांच्या आरामासाठी सर्व प्रकारची सुख-सुविधा असेल. हे दोन्ही समूह अर्थात जहन्नमवाले आणि जन्नतवाले समान असूच शकत नाही. हे दोन्ही समान कसे बरे असू शकतात? एकाने आपला शेवट ध्यानी राखला आणि त्यासाठी तयारी करीत राहिला, तर दुसरा आपल्या शेवटाविषयी निश्चिंत राहिला. म्हणून त्यासाठी त्याने कसलीही पूर्वतयारी केली नाही, किंबहुना गफलतीतच पडून राहिला.