(१) काहींनी पोटरी उघडण्याचा अर्थ कयामतची भयानकता असा घेतला आहे. परंतु एका सहीह हदीसमध्ये याचे भाष्य अशा प्रकारे केले गेले आहे की कयामतच्या दिवशी अल्लाह आपली पोटरी उघडी करील (जसे त्याच्या शान-प्रतिष्ठेस योग्य आहे) तेव्हा प्रत्येक ईमानधारक पुरुष आणि स्त्री त्याच्या पुढे सजद्यात पडतील. परंतु ते लोक बाकी राहतील, जे लोकांना दाखविण्यासाठी आणि नावाला सजदे करीत असत. ते सजदा करू इच्छितील, परंतु त्यांचा पाठीचा कणा लाकडी तक्त्यासारखा होईल, ज्यामुळे सजद्यासाठी झुकणे त्यांना अशक्य होईल. (सहीह बुखआरी, तफसीर सूरह नून वल कलम) अल्लाह ही पोटरी कशी उघडेल आणि ती कशी असेल? हे तर आम्ही जाणू शकत नाही, ना त्याचे वर्णन करू शकतो, यास्तव ज्याप्रमाणे कसल्याही उपमेविना आम्ही त्याचे कान, डोळे आणि हात वगैरे वर विश्वास राखतो, तद्वतच पोटरीची बाबही कुरआन व हदीसमध्ये उल्लेखित आहे, ज्यावर कसलेही भाष्य न करता विश्वास राखणे आवश्यक आहे. हेच सलफ आणि हदीसच्या विद्वानांचे मत आहे.
(१) जर तुम्हाला अल्लाहची मदत आणि संरक्षण लाभले नसते तर या काफिर लोकांच्या मत्सरपूर्ण नजरेला तुम्ही वाईटरित्या बळी पडला असता अर्थात त्यांची वाईट नजर तुम्हाला लागली असती. इमाम इब्ने कसीर यांनी याचा हाच अर्थ सांगितला आहे. पुढे ते लिहितात की हे या गोष्टीचे प्रमाण आहे की दृष्ट लागणे आणि अल्लाहच्या अनुमतीने त्याचा दुसऱ्यांवर वाईट प्रभाव पडणे सत्य आहे. जसे की अनेक हदीस वचनांनी हे सिद्ध आहे आणि हदीस वचनांमध्ये त्यापासून सुरक्षित राहण्याकरिता दुआ (प्रार्थना) सांगितल्या आहेत आणि हेही सांगितले आहे की तुम्हाला जर एखादी वस्तू चांगली वाटली तर ‘माशा अल्लाह’ किंवा ‘बारकल्लाह’ म्हणत जा, यासाठी की त्यास दृष्ट न लागावी. तसेच जर कोणाला दृष्टी लागली जर फर्माविले की त्याला आंघोळ घालून त्याचे पाणी त्यावर टाकले जावे, ज्याची दृष्ट त्याला लागली आहे. (विवरणाकरिता पाहा तफसीर इब्ने कसीर आणि हदीसचे ग्रंथ) काहींनी याचा अर्थ असा केला आहे की यांनी तुम्हाला धर्माचा प्रचार करण्यापासून परावृत्त केले असते.